वृत्तांकन: संदिप कसालकर
"ना मैदान पाहिलं, ना प्रतिस्पर्ध्याचा दबदबा... नेपाळच्या रिंगणात जोगेश्वरीच्या वाघाने असा काही पंच मारला की थेट 'गोल्ड मेडल'वरच नाव कोरलं!"
मुंबई: खेळण्याची जिद्द आणि अंगात असलेली धग जर पक्की असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी यश खेचून आणता येतं, हेच जोगेश्वरीच्या एका तरुणाने दाखवून दिलं आहे. जोगेश्वरी (पूर्व) येथील सोसायटी रोड नंबर १ चा रहिवासी चि. पार्थ प्रशांत राणे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि आपल्या मुंबईचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
नेपाळमधील पोखरा (Pokhara) येथे नुकत्याच पार पडलेल्या 'इंटरनॅशनल थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६' (International Thai Boxing Championship 2026) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पार्थने अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत विविध देशांतील कसलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, पार्थच्या आक्रमक आणि कौशल्याने परिपूर्ण अशा खेळासमोर प्रतिस्पर्धी टिकू शकले नाहीत. त्याने आपल्या धारदार खेळाच्या जोरावर थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि संपूर्ण परिसराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात उज्ज्वल केले.
पार्थच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण जोगेश्वरी परिसरात सध्या आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण आहे. "ही आम्हा सर्व जोगेश्वरीकरांसाठी अत्यंत अभिमानाची आणि छाती अभिमानाने फुगावी अशीच बाब आहे," अशा भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
पार्थच्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, त्याचे प्रशिक्षक (Coaches) यांचे अचूक मार्गदर्शन आणि त्याला खंबीर साथ देणारे त्याचे आई-वडील व मित्रपरिवार यांचे मोठे योगदान आहे.
- ब्यूरो रिपोर्ट, मेट्रो सिटी न्यूज, मुंबई.
0 Comments