वृत्तांकन: संदिप कसालकर
मुंबईत सध्या उन्हाचा पारा वाढल्याने एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. मात्र, याच वाढत्या विजेच्या वापराचा आणि ओव्हरलोडचा मोठा फटका जोगेश्वरी पूर्व येथील नागरिकांना बसला आहे. जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेतील प्रभाग क्र. ७२ मध्ये असलेल्या कृष्णा नगर, परेरा चाळ येथे तब्बल २२ घरांचे वीज मीटर जास्त लोडमुळे एकाच वेळी जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक कुटुंबं अंधारात चाचपडत आहेत.
एकाच वेळी २२ घरांचे मीटर जळाल्यामुळे संपूर्ण चाळ अंधारात बुडाली होती. ही गंभीर घटना समजताच शिवसेना (UBT) पक्षाचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी जळालेल्या मीटरची आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
"उन्हाळ्याच्या दिवसांत वीज नसणे म्हणजे नागरिकांसाठी नरकयातना भोगण्यासारखे आहे. त्यात एकाच वेळी २२ घरांचे मीटर जळणे गंभीर आहे," अशा भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या.
आमदार बाळा नर यांनी तात्काळ तिथल्या त्रस्त रहिवाशांशी संवाद साधून समस्येची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांचा संताप आणि अडचण पाहून त्यांनी थेट वीज वितरण कंपनीच्या (Electricity Board) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. "नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये. उन्हाळा असह्य आहे, त्यामुळे नवीन मीटर बसवून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करा," अशा कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच, जोपर्यंत प्रत्येक घराचा वीजपुरवठा व्यवस्थित सुरू होत नाही, तोपर्यंत स्वतः या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आमदार बाळा नर यांनी स्थानिक नागरिकांना दिलं. आमदारांच्या या तत्परतेमुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदारांसोबत स्वीकृत नगरसेवक कैलासनाथ पाठक, शाखा प्रमुख अमर मालवणकर यांच्यासह शिवसेना (UBT) आणि महाविकास आघाडीचे इतर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रशासनाकडे या कामाचा पाठपुरावा सुरू केला आहे.
#JogeshwariEast #AnantBalaNar #ShivSenaUBT #KrishnaNagar #PereiraChawl #MumbaiNews #ElectricityIssue #WebNews
0 Comments